Monday 23 January 2017

दुस्काळाचं आभाळ

➖➖➖➖➖➖➖➖➖
दुस्काळाचं आभाळ
➖➖➖➖➖➖➖➖➖
बा च्या मनात
दुस्काळाचं आभाळ
दाटून आलं व्हतं...

सगळीकडं दुस्काळाचं
थैमान माजलं
अन् त्यात पोरीचं लगीन आलं

बा पोरीच्या लग्नासाठी
पैशाची जूळवा-जुळव करत
सैरा-वैरा धावत हुता...

पोरीच्या लग्नासाठी बा नं
गोठ्यातली जनावरं विकली
पैशाची जुळवा-जुळव झाली
पोरीचं लगीन ठरलं
लगीन झालं
पोरगी सासरी नांदायला गेली
पण पोरीचा दादला(नवरा) दारूडा निघाला...

पोरीचा अधून-मधून
बा ला फोन यायचा
सगळी हकीकत पोरगी
बा ला फोनमध्ये सांगायची
बा कूणाला न सांगता
हातरूणात हुंदक्या देऊन रडायचा...

दादला पोरीला
रातभर दारू पिऊन मारायचा
पोरगी सकाळी उठून
वायरची पिशवी हातात घेऊन
माहेरला निघायची...

आलेली रात कशी तरी ढकलायची
सकाळी उठून मायच्या हातची
असेल ती चटणी भाकर खाऊन
शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या गाठी भेटी घ्यायची..
आणी बा च्या गळ्यात पडून
मोठ मोठयाने रडायची...

स्वतःच्या नशिबाला दोष देत
पोरगी पुन्हा सासरचा रस्ता धरायची...

त्या वेळेस
बा च्या डोळ्यात
दुस्काळाचं आभाळ
गच्च भरून यायचं.

             वेडा कवी
         सत्यवान कांबळे
     तारीख:23/01/2017
      मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/01/blog-post_23.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment