Friday 30 November 2018

माय बाप

बा
काळवंडलेलं तोंड वर खुपसत
चातकावानी 
पावसाची वाट बगायचा...

पाऊस कधी पडेल,
पेरणी कधी होईल
जनावरांना ओला चारा कधी मिळेल
याचाच सारखा विचार करायचा...

पाऊस पडल्यावर
शेतात दाणं पेरायचा
पिक डौलदार आल्यावर
पिकाकडं बगत-बगत
उभ्या आयुष्याची स्वप्नं रंगवायचा...

त्या भरल्या पिकात
कुणाला ज्वारी दिसते,
कुणाला बाजरी दिसते,
कुणाला मटकी
अन हुलगं दिसते...

मित्रहो,
मला माहित नाही
अजून कुणाला काय दिसते
पण मला
त्या भरल्या पिकात
अन तडपत्या उन्हात
काम करताना
माझी माय मला दिसते.....

त्याच भरल्या पिकात
उभ्या आयुष्याची स्वप्नं बघत
लेकरा बाळांच कल्याण होईल
म्हणून बाप गुरावानी राबायचा.....

पण
येण वेळी
पावसानं दगा
भरलेल पिक वाया गेलं.....

बाप
समाजात चिंतेत वावरू लागला
सावकार पैकं मागायला
घरी येईल या भिती पोटी
उपाशी राहू लागला.....

सावकार
पैकं मागायला घरी आला
चार दिस जाऊदी
असं सांगून बापानं
सावकरला माघारी पिटावलं

पण
बापानं आमासनी
पैशाची जुळवा जुळव करतू म्हणून
घरातून बाहेर पडला
पण बाप चार दिस घरी आला नाय
आम्ही शोधा-शोध चालू केली.....

तो पतूर गावातल्या
पाटलानी खबर दिली
अरं ये पोरा;
तुझ्या बापानं आमच्या वावरात
येरडाचं औषीद पिऊन जीवनयात्रा संपवली.....

माय अन मी
धावत पळत जाऊ पतूर
बापानं जीव सोडला हुता.....

बापाच्या हातात एक चिठ्ठी हुती
माझ्या छकुलीला
चांगला नवरा बगून
लगीन करून दया
ती मागेल ती हट्ट
सावकास का होईना पुरवा.....

उभ्या आयुष्यात
एवढं कधी वंगाळ वाटलं नव्हतं
ज्या दिसी बाप आमासनी सोडून गेला
त्यादिशी एवढं वंगाळ वाटलं
बापानं रंगवलेली स्वप्नं
ही स्वप्नेच राहिली.

     वेडा कवी
  सत्यवान कांबळे
मो.नं:8600243781
मो.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि सोलापूर
ही कविता खालील लिंक वर रजिस्टर केली आहे
कविता आवडल्यास कविच्या नावासहित पुढे पाठवा.

No comments:

Post a Comment