Saturday 22 September 2018

शिक्षणासाठी गाव सोडून रहाताना

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना.....
➖➖➖➖➖➖➖➖➖
(ही कवीता माझ्या काळजातली आहे.हे दिवस मी अनुभवलेले आहेत म्हणून माझ्या कंठातून हे शब्द बाहेर पडले.)

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना
भरपूर काही सहन करावं लागतं
सहन करता-करता 
घरच्यांना व जुन्या मित्र-मैत्रिणींना
आठवावं लागतं...

स्वतःची अभ्यासाची
स्पेशल खोली पण अपूरी वाटते 
मात्र;
बारा गावच्या बारा मित्रा बरोबर
रूम करून रहावं लागतं...

घरचं चूलीवरचं गरम पाणी गार वाटतं 
रूम मधल्या टाकीतलं 
गार पाणी पण गरम वाटतं
रूममधल्या टाकीतलं गार पाणी 
गरम समजून अंगावर घेऊन
आई गंऽऽऽऽऽऽ म्हणावं लागतं...

मेसमधल्या ज्वारीची भाकर बघुन
ज्वारीचं कोठार असलेल्या
मंगळवेढा संताच्या भूमीची
मला आठवण येते...

मेस मधलं जेवण बघुन
घरातल्या शिक्यावरच्या टोपलीची 
आठवण येते 
भुकेच्या आगीनं मेसचं 
जेवण पण मला जेवावं लागतं...

रात्री झोपेत दच्चऽऽकण जाग आल्यावर
त्या गोठ्यातल्या जनावरांची,
म्याव म्याव करणाऱ्या मनीची
आणि मोतीराम नावाच्या
कुत्र्याची मला आठवण येते...

मी घरी आजारी पडल्यावर 
माझ्या वेड्या मायला सांगायचो 
पण आता इथे रूमवर 
माझी वेडी माय नाय
आता कुणाला सांगु?
हा प्रश्न मला सारखा पडतो...

वेड्या मायची आठवण आल्यावर 
माझ्या डोळ्यात सारखचं पाणी येतं
ते पाणी मला सारखच 
शर्टानं पुसावं लागतं...

मात्र;
शिक्षणासाठी गाव सोडून राहताना
भरपूर काही सहन करावं लागतं
सहन करता-करता 
घरच्यांना व जुन्या मित्र-मैत्रिणींना
आठवावं लागतं.
           
            वेडा कवी
        सत्यवान कांबळे
    मो.नं:-8600243781 
  तारीख:-28/02/2015 
मु.पो.रड्डे ता. मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_30.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment